सोलापूर - शहर व परिसरात लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच अवैध धंद्यांना उत आला आहे. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकळी येथे सुरू असलेल्या आकडा बाजारावर(जुगार) एसपी विशेष पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत 11 संशयित आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 4 लाख 13 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे आकडा बहाद्दूर ऑनलाइन आकडा घेत होते आणि, पेमेंट देखील ऑनलाइन म्हणजेच गूगल पे वरून केले जात होते.
सोलापूर-विजयपूर महामार्गावरील टाकळी येथे कारवाई-
सोलापूर-विजयपूर महामार्गावरील टाकळी या गावालगत तब्बल १५ वर्षापासून चोरून मटका अड्डा चालवला जात होता. त्यावर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलीस पथकाने ११ आरोपींना अटक केली. दरम्यान मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाल्याने चिरीमिरी घेऊन डोळेझाक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहेत.

या कारवाईत सतीश गोपाळ मदुरे(वय 29 वर्ष),संतोष मदूरे(वय 30 वर्ष),सिद्राम मनोहर मदूरे(वय वय 35 वर्ष),लक्ष्मण रामचंद्र झेंडेकर(वय 30 वर्ष),लक्ष्मण आळेप्पा केरूर(वय 29 वर्ष),तम्माराय बंडप्पा कुंभार(28 वर्ष),विनायक गोवर्धन झेंडेकर(वय 18 वर्ष),सुनील सिद्राम झेंडेकर(वय 18 वर्ष),नागनाथ बसवराज कुंभार(वय 254 वर्ष),परशुराम रामकोंडा कोळी(वय 35 वर्ष),जटप्पा चिदानंद कोळी(वय 38 वर्ष) सर्व संशयित आरोपी राहणार टाकळी दक्षिण सोलापूर या आरोपींना अठक करण्यात आली आहे.
4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला-
रोख रक्कम, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल,दोन दुचाकी वाहन, दोन प्रिंटर, 10 वह्या, आकडा लिहिलेल्या चिट्ट्या असा एकूण 4 लाख 13 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केला आहे. याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल झाला आहे.
गूगल पे वरून पैशांची देवाण घेवाण-
संशयित आरोपींनी आकडा व्यवसायात आधुनिक पद्धत अवगत करून आकडा बाजारातील रकमेची किंवा पैशाची देवाण घेवाण ही गूगल पे या ऑनलाइन मार्गातून करत होते. पूर्वीसारखी एखादी चिट्टी लिहून घेण्याची पद्धत झुगारून आता या जुगारींनी ऑनलाइन पद्धत सुरू केली आहे. आकडे देखील व्हाट्सएपच्या माध्यमातून किंवा एसएमएसच्या माध्यमातून स्वीकारत जात आहेत.
या विशेष पथकाने केली कारवाई-
स्थानिक गुन्हे शाखा किंवा स्थानिक पोलीस ठाणे यांच्या डोळ्यात माती टाकून टाकळी गावाच्या शेतात एका पत्राच्या शेड मध्ये हा आकडा बाजार सुरू होता. मात्र, गुरुवारी पोलिसांनी या मटक्याचा बाजार उठवला आहे. पोलीस निरीक्षक विनय बहिर,पोलीस कॉन्स्टेबल मदने, भुईटे, हेमाडे आदींनी ही कारवाई केली आहे.