सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राज्य सीमेवर ११ ठिकाणी राज्यस्तरीय चेक पॉईंट उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
सोलापूर निवडणुकीच्या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ विधानसभा मतदार संघ असून यामध्ये सोलापूर, माढा आणि उस्मानाबाद या ३ लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेचा समावेश करण्यात आला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ, तर माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी कर्नाटक राज्याची सीमा असल्याने राज्य सीमेवर ११ चेक पोस्ट उभारण्यात येणार आहेत. या आंतरराज्य चेक पोस्ट पॉईंटवर राज्यात येणाऱ्या व राज्यातून जाणाऱ्या वाहनांवर निवडणुकीच्या काळात करडी नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून पाटील, सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस आयुक्त महादेव तांबडे अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.