सिंधुदुर्ग - भारतीय संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या चातक पक्षांच्या स्थलांतराचा सॅटेलाईट तंत्रज्ञानाच्या आधारे मागोवा घेऊन भारतीय हवामान बदला बाबतची माहिती मिळवण्याचा पहिला प्रयोग खंडित झाला आहे. सॅटेलाईट टॅगींग केलेले 'मेघ' आणि 'चातक' नामक दोन्ही चातक पक्षी आता नॉट रिचेबल झाले आहेत. मान्सूनसोबत परतीच्या प्रवासात असलेल्या चातक पक्षाचे शेवटचे लोकेशन सिंधुदुर्गमार्गे कारवार असे रेकॉर्ड करण्यात आले आहे. प्रयोगात बाधा आल्याने चिंता व्यक्त करताना, आम्ही अजूनही चातकांशी पुन्हा संपर्क स्थापित होईल या आशेवर आहोत, असे भारतीय वन्यजीवन संस्थे(डब्ल्यूआयआय)च्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
![चातक पक्षासोबत डॉ. सुरेश कुमार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sindhudurg-2-wii-isro-10022_20122020094201_2012f_1608437521_314.jpg)
डब्ल्यूआयआय आणि आयआयआरएसचा संयुक्त प्रकल्प -
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (डब्ल्यूआयआय) व इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआयआरएस) यांच्या सहकार्यातून पाईल्ड कोकिल्ड मायग्रेशन स्टडी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यानुसार भारत सरकारच्या बायो टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट (डीबीटी)च्या काही मोठ्या प्रकल्पांचा एक भाग असलेल्या भारतीय बायोसोर्स इन्फॉर्मेशन नेटवर्क (आयबीआयएन) या प्रकल्पाअंतर्गत डेहराडून येथून 'मेघ' व 'चातक' नामक दोन चातक पक्षांना दोन ग्रॅम वजनाचे सॅटेलाईट टॅग बसवण्यात आले होते. वन्य जीव तंत्रज्ञानामध्ये तज्ञ असलेल्या मायक्रोवेव्ह टेलीमेट्री या अमेरिकन कंपनीकडून उपग्रह ट्रान्स मीटर चिप्स असलेले हे टॅग खरेदी करण्यात आले होते. लुप्तप्राय प्रजाती व्यवस्थापन विभागाचे वैज्ञानिक डॉ. सुरेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील डॉ. गौतम तालुकदार, डॉ. समीर सारंग यांची टीम या पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होती.
एका चातकाने केला डेहराडून-सिंधुदुर्ग-कारवारपर्यंतचा प्रवास -
मान्सूनच्या काळात टॅगींग केलेले दोन्ही पक्षी सुरुवातीला डेहराडूनच्या आसपास वास्तव्यास होते. या दरम्यान 'मेघ' नावाच्या चातक पक्षाचा डेटा मिळणे अचानक बंद झाले. परंतु दुसऱ्या चातक पक्षाकडून आम्हाला अखंडित डेटा मिळत होता. या पक्षाकडून मिळालेल्या डेटानुसार मान्सूनच्या परतीच्या प्रवासा बरोबर या पक्षानेही भारताच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीकडे कूच केली होती. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत या चातकाने सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीमार्गे कारवार असा प्रवास करून कारवारमध्ये काही काळ विश्रांती केल्याची शेवटची नोंद मिळाली. हा पक्षी योग्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांची वाट पाहून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून आफ्रिकेकडे जाण्यासाठी उड्डाण भरेल, असा अंदाज होता. मात्र, कारवारमध्ये चातकाशी संपर्क खंडित झाल्याने पुढील डेटा मिळणे बंद झाले आहे, अशी माहिती डॉ. सुरेश कुमार यांनी दिली.
![सॅटेलाईट टॅगींग केलेल्या चातक पक्षाचा मार्ग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9942005_184_9942005_1608438373611.png)
स्थलांतरित पक्षांसाठी कोकण प्रदेश ठरतोय कॉरिडॉर -
अमुर फाल्कन या पक्षालाही मणिपूर येथून टॅगिंग केले होते. अमुर फाल्कन पक्षी कोकण किनारपट्टीवरूनच आफ्रिकेत गेला होता. अंदाज आहे की, अमुर सोबतच चातक देखील याच मार्गाने अरबी समुद्र ओलांडून आफ्रिकेत जात असावा. अरबी समुद्र ओलांडताना देशातील स्थलांतरित पक्षांसाठी कोकणचा भाग कॉरिडॉर ठरत आहे. चातक पक्षी आणि मान्सून यांचे नाते सर्वश्रुत आहे. वर्षा सरींनी आपली तहान भागवणारा पक्षी म्हणून चातक भारतीय लोककथांमध्ये ओळखला जातो. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर चातक पक्षी आणि भारतीय मान्सून यांचा संबंध, हवामान बदलाचे संकेत यांचा अधिक उलगडा करणे सोप झाले, असते डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले.