सिंधुदुर्ग - लॉकडाऊनमुळे मुंबई आणि पुण्यातले लोक आपापल्या गावाकडे परत आले आहेत. मुंबईतून कोकणात येणाऱ्यांचा लोंढा प्रचंड वाढला. यानंतर या येणाऱ्या चाकरमाण्यांमुळे कोरोना पसरेल, अशी भीती निर्माण झाली. यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांविरुद्ध स्थानिकांच्या मनात राग होता. मात्र, मुंबईतून कोकणात कणकवली तालुक्यातील कुंभवडे या गावी परतलेल्या अशाच दोन चाकरमाण्यांनी आपल्या वाडीचे 30 वर्षांपासून रखडलेले साकवाचे काम पूर्ण केले.
गावी आलेल्या दोन मुंबईकरानी ठरवले की, गेल्या कित्येक वर्षापासून दळणवळणाच्या सुविधेअभावी दरवर्षीच्या पावसाळ्यात एकमेकांपासून वेगळ्या पडणाऱ्या दोन वाड्या जोडायच्या. म्हणून मग त्यांनी गावातल्याच फुटलेल्या जुन्या बंधाऱ्यातील मोडके-तोडके सामान गोळा केले आणि कल्पकतेने या दोन वाड्यांना जोडणारा साकव तयार केला. लोकांच्या मदतीने त्यांनी जवळपास 10 दिवसांमध्ये हे काम करून दाखवले.
मुंबईला उच्च शिक्षण खात्यात काम करणारे महेंद्र उर्फ भाई दुखंडे आणि त्यांचे मित्र मंगेश सावंत हे 20 मार्चला सिंधुदुर्गातल्या आपल्या कुंभवडे गावी आले. 22 मार्चला जनता कर्फ्यू लागला आणि पुढे लगेचच लॉकडाऊन सुरू झाले. या दोघांनाही शेतीची ओढ. पण ज्या वाडीत यांची शेती आहे त्या वाडीत जायचे तर एक मोठा ओढा पार करावा लागत असे. या कारणामुळेच मागील अनेक वर्षांपासून, बहुतांश शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले होते.
दरवर्षी पावसाळ्यात हा ओढा वेगाने वाहायचा. यामुळे ओढ्यातून बैल आणि माणसं जाणार कशी? किती वेळा जीव धोक्यात घालायचा? कधी कधी तर चार दिवस ओढ्याचे पाणी ओसरेपर्यंत पलिकडे अडकलेल्या लोकांना, अलिकडून भाकरी चटणी द्यायची तर ती एका पिशवीत बांधून त्यांच्याकडे भिरकवावी लागायची. गावाची ही अडचण त्या दोघांच्या मनात होती. तेव्हा त्यांनी साकव बांधण्याचा निर्धार केला.
कोकणात पाणी अडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत गावागावात अनेक ठिकाणी, कोल्हापूर टाईपचे केटी बंधारे बांधण्यात आले आहेत. पण येथील भौगोलिक परिस्थिती पाहता हे सर्व बंधारे निरुपयोगी ठरले. या बंधाऱ्यांच्या वाहून आलेल्या प्लेट्स या दोघांनी गोळा केल्या. मोडके तोडके लोखंडी रॉड्स गोळा केले, गावातल्या मोऱ्या बांधून शिल्लक उरलेले सिमेंट पाईपचे दोन तुकडे आणले आणि कल्पकतेने दहा दिवसात चाळीस फूटी साकव उभारला. आता या गावचा मोठा प्रश्न सुटला आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गात 'चढणीचे मासे' पकडण्यासाठी लोकांची झुंबड
हेही वाचा - जातीय हिंसाचाराविरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन