सिंधुदुर्ग- मालवण तालुक्यातील वायंगणी भंडारवाडी येथील सुभाष पांडुरंग साटम यांच्या बंद घराच्या छतावर लोकांना दोन बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे, गावात एकच धांदल उडाली. गावात दिवसा बिबट्यांचा संचार वाढल्यामुळे वायंगणी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वायंगणी येथील मयुरेश पेडणेकर, रितेश लाड यांना साटम यांच्या घराच्या छतावर गुरगुरल्या सारखा आवाज आला. आवाज कोण काढत आहे, हे जाणून घेण्यासाठी वर पाहिले असता त्यांना टेरेसच्या कठड्यावर २ बिबटे बसलेले दिसून आले. बिबटे दिसताच पेडणेकर आणि लाड यांनी आरडाओरड करत वाडीतील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. यानंतर बिबट्यांना बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
ग्रामस्थांचा गलका वाढल्याने दोन्ही बिबट्यांनी टेरेसवरून उडी मारत जंगलात धूम ठोकली. बिबट्यांनी दिवसा मनुष्य वस्तीत येवून आपले बस्तान मांडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय बिबट हे शेतकऱ्यांच्या जनावरांवर किंवा भक्ष न मिळाल्यास ग्रामस्थांवरही हल्ला करू शकतील, अशी भीती वायंगणी ग्रामस्थांना वाटत आहे. त्यामुळे, वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करवा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा- कोरोनाविषयी चित्रांमधून जनजागृती, कलाकार रजनीकांत कदम यांचा उपक्रम