सिंधुदुर्ग - कणकवली सांगवे केळीचीवाडी येथे रिक्षा व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. हा अपघात कणकवली-कनेडी मार्गावरील केळीचीवाडी येथे आज दुपारी झाला.
दुचाकी आणि रिक्षा यांची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री (वय 40) व परशुराम अनंत पांचाळ (वय 48) हे दोघे जागीच ठार झाले. तर रिक्षामधील माधुरी मनोहर घाडीगावकर (वय 47), बाळकृष्ण सदाशिव घाडीगावकर (वय 80), मनोहर बाळकृष्ण घाडीगावकर (वय 42), गणेश अशोक घाडी (वय 30) हे जखमी झाले. यातील काहींना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून तिघांना खासगी रुग्णालयात तर एकाला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.