सिंधुदुर्ग - तिलारी घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने जड वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. दोडामार्ग मार्गे सिंधुदुर्ग-बेळगाव असा हा राज्यमार्ग आहे. केबलसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळेच ही दरड कोसळल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
दोडामार्ग तालुक्यातून तिलारी घाटमार्गे रस्त्याच्या बाजुच्या पट्टीलगत केबल टाकण्यात आली आहे. ही केबल रस्त्याच्या साइडपट्टी लगत टाकल्याने संपूर्ण रस्त्याच्या बाजूला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी केव्हाही मोठा अपघात होऊ शकतो.
या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्गात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात तळकोकणातील घाट रस्त्यांना पावसाळ्यात फटका बसून भूस्खलन तसेच दरडी कोसळण्याचे प्रकार होतात. त्यातच पावसामुळे जिल्ह्यातील गगनबावडा, भुईबावडा, आंबोली, तिलारी आदी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू आहे. आज पहाटे तिलारी घाटात याच ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे चारचाकी वाहनांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.