सिंधुदुर्ग - देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात एवढे निष्क्रिय मुख्यमंत्री झाले नाहीत, अशी टीका नारायन राणे यांनी केली आहे. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या माणसाने आरोप करूनही शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली याचे आश्चर्य वाटते, असेही भाजपा नेते नारायण राणे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते.
सचिन वाझेला मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातले-
यावेळी बोलताना नारायण राणे पुढे म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे पूर्णता फेल झालेले आहेत. पोलीस खात्यात कुपंनच शेत खातय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुकेश अंबानीच्या घराजवळ स्पोटंकांची गाडी आढळली. त्या ठीकाणी सचिन वाझे पहीले पोहचले. ती गाडी मनसुख हिरेन यांची आहे हे समोर आले. मनसुख हिरेन आणि सचिन वाझेचे जवळचे संबध असल्याचे बाहेर आल्यावर मनसुखची हत्त्या झाली. सचिन वाझेनी हत्या केल्याचा मनसुखच्या बायकोने आरोप केला. तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठीशी घातलं.
सचिन वाझे पोलीस कमिशनर पेक्षा मोठा आहे का?-
मनसुख हीरेन प्रकरणात सचिन वाझेला अटक होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यानी प्रयत्न केले, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. सचिन वाझे 100 कोटींची मागणी करत असताना मुख्यमंत्र्याची कारवाई नाही, ना गृहमंत्र्याची चौकशी. असे सांगताना सचिन वाझे हा पोलीस कमिशनर पेक्षा मोठा आहे का?, असा प्रश्न देखील नारायण राणे यांनी विचारला आहे.
शरद पवार यांच्यावर साधला निशाणा -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी पत्रकार परीषदेत सांगितले अनिल देशमुख दोषी नाहीत. ते कोरोनाने आजारी होते. त्यानंतर माहिती मिळाली ते कुठे कुठे फिरले, विमानाने कुठे कुठे गेले. शंभर कोटी पोलीसांना जमवायला सांगितले. तरी पवार साहेब म्हणतात अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करणार नाही. मला समजत नाही की शरद पवार एवढे ज्येष्ठ नेते असतानाही, पैसे जमा करायला सांगणाऱ्या गृहमंत्र्यांवर कारवाई करणार नाही, असे म्हणतात. कोणी निंदा कोणी वंदा, भ्रष्टाचार करणे हा आमचा एकमेव धंदा, असच या सरकारबाबत म्हणावा लागेल असेही राणे यावेळी म्हणाले.
सचिन वाझे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातला ताईत-
सचिन वाझे मुख्यमंत्रीच्या गळ्यातील ताईत झाला होता. वाझे सारख्या एपीआयच्या अनेक वेगवेगळ्या गाड्या आहेत. या महागड्या गाड्या त्याच्याकडे आल्या कुठून आल्या. कोट्यावधी रुपयांचा फ्लॅट त्याने कसा काय घेतला? तो ओबेरॉय मध्ये राहतो काय? मातोश्रीवर राहतो काय? त्याच्या प्रॉपर्टीची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.
रश्मी शुकला यांच्या अहवालाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही-
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी वेगवेगळ्या लोकांचे फोन टॅप करून बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केला. कुणाला किती रुपये द्यावे लागतात, कोणते पद मिळवण्यासाठी किती रुपये द्यावे लागतात याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. आधी कारवाई कशी करतात हे या मुख्यमंत्र्याला माहित आहे की नाही ? असा प्रश्नच आहे, असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला आहे.
राज्यातली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे-
राज्यात परीस्थिती अत्यंत गंभीर आहे. एकाबाजूने कोरोना वाढतोय. राज्यात सद्यस्थितीत कोरोणाचे 52 हजार रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संखेपैकी 50 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत, असा आरोप देखील नारायण राणे यांनी केला आहे. तीन पक्षात फक्त पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. जनतेच्या पैशाची लूटालूट चालली आहे. मुकेश अंबानीना पैशासाठी धमकी देत आहेत. म्हणून केंद्रीय गृहमंत्र्याना पत्र पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. तीच आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
सरकारचे लवकरच विसर्जन होईल-
देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात एवढे निष्क्रिय मुख्यमंत्री झाले नाहीत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीची मागणी उद्या पुन्हा अधिवेशनात करणार, अशी माहिती देखील नारायण राणे यांनी यावेळी दिली.आता लवकरचं या सरकारचं विसर्जन होणार असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.