सिंधुदुर्ग - महामार्गाचे निकृष्ट काम करणार्या ठेकेदारावर तसेच अभियंता आणि कामावर देखरेख ठेवणार्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर आणि जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी सोमवारी केली. तर भिंत कोसळल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकार्यांसमोर केलेली स्टंटबाजी केवळ अर्थपूर्ण व्यवहारासाठी होती, असाही आरोप त्यांनी केला आहे. सोमवारी कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत एस.एम हायस्कुलजवळ बॉक्सेलची भिंत कोसळली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीका केली.
विजयभवन येथे सतीश सावंत, संदेश पारकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड आदी उपस्थित होते. कणकवली शहरातील बॉक्सेलचे काम निकृष्ट झाले आहे. त्यामुळे बॉक्सेल आणि त्यासोबतची भिंत काढून जानवली नदीपर्यंत उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करावे, अशी चर्चा खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा झाली आहे. तर राऊत यांनीही त्याबाबतचा पत्रव्यवहार केंद्राकडे केला असल्याचे पारकर म्हणाले.
भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर आमदार नीतेश राणे यांनी तेथे जाऊन निव्वळ स्टंटबाजी केली. तसेच प्रांताधिकार्यांसमोर असभ्य भाषा देखील वापरली. आमदारांची आजची स्टंटबाजी अर्थपूर्ण व्यवहारासाठी होती. वर्षभरापूर्वी आंदोलन केले त्यानंतर ते गप्प का बसले? ते सध्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्रातील भाजप सरकारकडून याबाबत चौकशी लावायला हवी होती. दिलीप बिल्डकॉन कंपनी ही केंद्र सरकारचा जावई आहे का? महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी झाली पाहिजे. यात मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप संदेश पारकर, सतीश सावंत यांनी केला आहे.
निकृष्ट काम करून महामार्ग ठेकेदाराने संपूर्ण कणकवलीची वाट लावली आहे. हायवे ठेकेदार लोकांच्या जीवाशी खेळत आहे. पहिल्याच पावसात उड्डाण पुलाच्या जोड रस्त्याची भिंत कोसळली. ही भिंत वाहनावर, नागरिकांवर कोसळली असती, तर अनेकांना नाहक जीव गमवावा लागला असता असा आरोप, आमदार राणे यांनी करत हायवे ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता.
हेही वाचा - महामार्ग कंत्राटदाराचा लोकांच्या जीवाशी खेळ, आमदार नितेश राणे यांचा आरोप