सिंधुदुर्ग - जिल्ह्यात काल(रविवार) दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी मूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. कोरोना संकटामुळे भक्तांचा उत्साह मात्र फारसा जाणवला नाही. स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर विसर्जनाचा कार्यक्रम आटोपण्याची विनंती केली होती. त्याला गणेश भक्तांनी प्रतिसाद दिला.
कणकवली तालुक्यासह शहरातील दीड दिवसांच्या गणपतींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. शनिवारी घरोघरी गणपतींचे पूजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीने कमीत कमी कालावधीत गणपती विसर्जन करावे, असे गणेश भक्तांना आवाहन केले होते. त्यानुसार भाविकांनी रविवारी दुपारी लवकरच गणपती विसर्जनाला सुरुवात केली. शहरातील गणपती साना यांसह अन्य ठिकाणी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचा प्रार्दूभाव होऊ नये यासाठी विसर्जनाला गर्दी कमी दिसत होती.
वेंगुर्लेत कंटेंन्मेंट झोनमधील गणपतींचे नगरपरिषदेमार्फत विसर्जन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेने ९ वाजेपर्यंत गणपती विसर्जन करावे, असे जाहीर केले होते. त्यानुसार भाविकांनी सायंकाळी ४ वाजल्यापासूनच गणपती विसर्जनाला सुरुवात केली. वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील कंटेंन्मेंट झोनमध्ये असलेल्या घरांमध्ये पूजन करण्यात आलेल्या गणपतींचे विसर्जन नगरपरिषदेमार्फत सर्व नियम पाळून करण्यात आले. गाडीअड्डा येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मिळाल्याने तेथील रुग्ण वास्तव्यास असलेला भाग कंटेंन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता.
कंटेंन्मेंट झोनमधील रहिवाशांना बाहेर फिरण्यास बंदी असल्याने त्यांच्या गणपतींचे विसर्जन दीड दिवसांनी नगरपरिषदेमार्फत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, नगर अभियंता अभिषेक नेमाणे, फिल्टर ऑपरेटर जयेंद्र चौधरी, सफाई कामगार बाबूराव जाधव, हेमंत चव्हाण, अनिल वेंगुर्लेकर, देवेंद्र जाधव, किरण जाधव, वाहन चालक अक्षय तेरेखोलकर, शशांक जाधव यांनी यावेळी गणपती विसर्जनासाठी सहकार्य केले.
मालवण सुनेसुने
मालवणात दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन साध्या पद्धतीने करण्यात आले. कोरोनामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले असले तरी भाव भक्तीचा जागर कायम असल्याचे दिसून आले. गणेश मूर्ती विसर्जनासाठी वाद्यांची साथ नसली तरी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जोरदार जयघोषाने भक्तांनी आसमंत दणाणून सोडला. मालवण बंदर जेट्टी येथे गणेश भक्तांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करताना गणरायाची आरती करत समुद्रात मूर्तीचे विसर्जन केले. दरवर्षी गणेश विसर्जनानिमित्त गजबजणारा बंदर जेटी किनारा यावर्षी मात्र काहीसा सुनासुना वाटत होता.