सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या 2020-21 या वर्षासाठी 240 कोटींच्या वार्षिक आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. तसेच चालू वर्षाचा 225 कोटींचा निधी मार्च अखेरपर्यंत 100 टक्के खर्च करावा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. तसेच ज्या विभागाचा निधी खर्च होणार नाही, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नियोजन समिती सभेला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस काढून 24 तासात कारवाई करावी, असे सक्त आदेशही पालकमंत्री सामंत यांनी दिले आहेत.
जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात पार पडली. आजच्या नियोजन समिती सभेत जिल्ह्याच्या चालू वर्षाचा (2019-20) 225 कोटींच्या आराखड्यात 15 कोटीने वाढ करून 2020-21 या वर्षासाठी 240 कोटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे. तर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - मंगलप्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्ष पदावरून उचलबांगडी?
यावेळी माजी पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार नारायण राणे, जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रभारी पोलीस अधिक्षक तुषार पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.