सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आतापर्यंत बाहेर अडकलेले 5 हजार 396 जण दाखल झाले आहेत. यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, पाच वर्षांखालील मुले व त्यांच्या माता, 60 वर्षांवरील वृद्ध, अपंग व दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने अशा व्यक्तींची तपासणी करून अटी व शर्तींच्या अधीन राहून 28 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
देवगड तालुक्यातील वाडा येथील कंटेनमेंट झोनमधील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तीन किलोमीटरच्या या कंटेनमेंट झोनमध्ये वाडा, नाडण आणि पुरळ या गावांचा समावेश होता. 19 पथकांनी 822 घरांमधील 945 कुटुंबातील एकूण 3 हजार 697 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. या तपासणीमध्ये एकही व्यक्ती बाधित झाली नसल्याचे दिसून आले. तसेच देवगड तालुक्यात वाडा येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
दरम्यान, परराज्यातून व राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 मे 2020 रोजी 1 हजार 245 व्यक्ती दाखल झाले. त्यानंतर 14 मे रोजी जिल्ह्यात एकूण 5 हजार 396 व्यक्ती दाखल झाले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी गुरुवारी जिल्हा प्रशासनातर्फे 321 पास देण्यात आले.