सिंधुदुर्ग - दिशा सालियान आणि पूजा चव्हाण प्रकरणात मी गप्पा बसणार नाही असे म्हणणाऱ्या नारायण राणेंना इशारा देताना खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गातील राजकीय खुनांचा संदर्भ देत वेळ पडल्यास या प्रकरणाच्या फाईली उघडू, असे म्हटले आहे. कणकवलीत मणचेकर, मालवणमधील रमेश गोवेकार यांच्यासह नारायण राणे यांचे चुलत बंधू अंकुश राणे यांच्यासह त्यांचेच कार्यकर्ते बाळा वळंजू खुनाचा संदर्भ असल्याचे म्हटले आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते.
'आमच्याकडेसुद्धा भरपूर मटेरिअल '
खासदार राऊत म्हणाले, की आम्हाला कुणाचे काही बिघडवण्यामध्ये अजिबात रस नसतो. परंतु शिवसेनेला डिवचण्याचे काम आणि शिवसेनेवर आघात करण्याचे काम जर कुणी केले तर त्याला पुरेपूर बिघडवून त्याला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प राहणार नाही. त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये गप्प राहण्यासाठी शिवसेनेने कधीही सांगितले नाही. कोणत्या गोष्टी घेऊन त्यांना धावायचे असेल तर त्यांनी जरूर धावावे. आमच्याकडेसुद्धा कणकवलीतील मनचेकरांच्या खुनाचा संदर्भ आहे. आमच्याकडेसुद्धा रमेश गोवेकारांच्या खुनाचा संदर्भ आहे. आमच्याकडेही अंकुश राणेंच्या खुनाचा संदर्भ आहे. वारगावचे बाळा वळंजू यांचा संदर्भ आहे. आमच्याकडेसुद्धा भरपूर मटेरिअल आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. किती धावायचे तेवढे धावा. एकएक काढू बाहेर, असेही ते म्हणाले.
'मुख्यमंत्री असे काही बोललेले आमच्या वाचनात नाही'
योगी आदित्यनाथ यांचे थोबाड फोडण्याच्या संदर्भात कोण बोलले असेल किंवा मुख्यमंत्री बोलले असतील पण आमच्या वाचनात कधी आले नाही. मग ज्यावेळी बोलले त्यावेळी हे काय झोपले होते का? आता तुमच्या अपराधांवर पांघरून घालण्यासाठी योगी आदित्यनाथांचा संदर्भ देऊन कुठेतरी आपली कातडी वाचवायला निघालेली ही मंडळी आहे. असे सांगतानाच नारायण राणेंकडे चांगुलपणा आहे हाच नेमका संशोधनाचा विषय असेल, असेही ते म्हणाले.
'जनआशीर्वाद यात्रेमुळे शिवसेनेला घाबरून जाण्याचे काही कारणच नाही'
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नियम ३७अन्वये कायदेभंग करू नये किंवा जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेतच. त्या जमावबंदीचे उल्लंघन करून जर कुणी यात्रा करत असेल तर प्रशासन, शासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेलच. जर आम्हाला कुणाच्या तरी जनआशीर्वाद यात्रेमुळे आम्हाला घाबरून आणि शिवसेनेला घाबरून जाण्याचे काही कारणच नाही आणि शिवसेना घाबरलेलीच नाही. अशा बऱ्याच जन आशीर्वाद यात्रा निघाल्या. खऱ्या अर्थाने जनआशीर्वाद यात्रा हा शब्द शिवसेनेचा आहे. तो ते चोरून घेऊन काढतायत. अनेकांनी काढाव्यात, कुठेही जाव्यात. पण या महाराष्ट्रामध्ये महाविकासाघाडीच सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या हिताचे जे काम करते, हे असेच करत राहील. ही पाच वर्ष पूर्ण करेल आणि भविष्यात पाच वर्षे देखील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये असेल.