सिंधुदुर्ग - शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab Attack Case) यांच्यावरील हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर आज (5 फेब्रुवारी) जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, नितेश राणे यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात (CPR Hospital Kolhapur) त्यांना उपचारासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली नेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
नितेश राणे आहेत न्यायालयीन कोठडीत -
कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कालच तातडीने नितेश राणे यांच्या वकिलांनी आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या जामीन अर्जावर शनिवारी दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळपासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली होती. त्यानंतर न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.