सिंधुदुर्ग Six People Drowned : पुण्यातून सहलीला कोकणात आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला पडला आहे. देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले सहा पर्यटक बुडाले असून त्यातील चार जणांचे मृतदेह मिळाले. तर एकावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. सहलीला आलेले विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. यापैकी चार मुलींचे मृतदेह सापडले आहे. तर एक मुलाचा शोध सुरू आहे. तर आणखी एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाजण बुडाले. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकरच शोध घेतला जात आहे.
समुद्रकिनारी वाढले पर्यटक : देवगडमध्ये पवन चक्की गार्डनमुळे देवगडला एक वेगळे रूप प्राप्त झाले आहे. जिल्हा बाहेरून अनेक पर्यटक या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळं देवगडमधील समुद्रकिनारा सुद्धा पर्यटकांनी भरू लागला आहे. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याकडे (Vijaydurg Fort) सुद्धा पर्यटकांचा ओघ हळूहळू वाढू लागला आहे. परंतु कोकणातील तारकर्ली, देवबाग या भागाचा पर्यटनदृष्या जेवढा विकास झाला तेवढा विकास देवगड तालुक्याचा झालेला नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी दिलेल्या शोक संदेशात म्हटलंय की, 'सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली. अन्य प्रशिक्षणार्थींना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू पावलेल्या प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. समुद्र किनारी, डोंगर दऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन आहे.'
पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत : देवगड तालुका हळूहळू पर्यटन दृष्ट्या विकसित होत असतानाच, अति उत्साही पर्यटकांमुळं देवगड बीच, किनारे बदनाम होऊ लागले आहेत. मालवण, तारकर्ली, देवबाग या परिसरामध्ये अति उत्साही पर्यटकांमुळे अनेकांना आपला बुडून जीव गमवावा लागला. त्यातच आता नव्याने देवगड समुद्रकिनाऱ्याची देखील भर पडली आहे. अशा या समुद्रकिनाऱ्यांवरती सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ठोस उपाय योजना करण्याचे गरज आहे. परंतु समुद्रकिनाऱ्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतेही उपाय योजना केल्याचं आढळून येत नाही.
हेही वाचा-