सिंधुदुर्ग - रत्नागिरीमधील नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यामुळे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याचे बोलले जात होते. याच कारणास्तव जठार यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागण्या मान्य केल्याने आपली नाराजी दूर झाल्याचे जठार यांनी यावेळी सांगितले.
नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळेच देवेंद्र सरकारने शिवसेनेपुढे नमते घेऊन अखेर नाणार प्रकल्प रद्द केला. प्रकल्प रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेणाऱ्या जठार यांच्या पदरी मात्र निराशा पडली. त्यामुळे आपल्याच सरकारच्या निर्णयावर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार नाराज होते. याचा निषेध म्हणून प्रमोद जठार यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे जठार यांनी आपला राजीनामा सोपवला. यावेळी मुख्यमंत्री आणि जठार यांच्यात चर्चा देखील झाली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्याचे जठार यांनी सांगितले. यामध्ये रिफायनरी प्रकल्प कोकणातच व्हावा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८० टक्के तरुणांना त्यात रोजगार मिळावा या प्रमुख मागण्या होत्या. याच मागण्या मान्य झाल्याचे जठार यांनी सांगितले. त्यामुळेच प्रमोद जठार यांच्या या राजीनामा नाट्यावर २४ तासांच्या आत पडदा पडला.