सिंधुदुर्ग - सत्ता येते जाते ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. मात्र, संकटाच्या काळात राजकीय स्पर्धेपेक्षा गाव सुरक्षित करणारी स्पर्धा लागली पाहिजे. सकारात्मक विचारांच्या निकोप कार्यांची गावांना गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्याचे पुफुस आहे. त्याला निरोगी करून, कोरोनामुक्त सिंधुदुर्ग जिल्हा बनवूया, त्यासाठी वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करत राहू, असे आदर्श गाव हिरवे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच, सदस्य यांचे पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासोबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
हिरवेबाजार कोरोना मुक्तीचे मांडले मॉडेल
कोरोनाचा रेड झोन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगावी वाढणारी कोरोना रुग्णसंख्या रेखण्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार यांनी सरपंचांना यावेळी मूलमंत्र दिला. हिरवेबाजार कोरोना मुक्त कसा केला आणि त्यासाठी गावातील लोकांचे टीमवर्क कसे केले, याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, गावातील समाजसेवी लोकांच्या फ्रंटलाईन वर्कस म्हणून वेगवेळ्या पाच तुकड्या केल्या, प्रत्येक तुकड्यांना कामाची विभागणी करून दिली. त्यात रुग्ण तपासणीला नेण्यापासून, विलगिकरण, समुपदेशनापर्यंत जबाबदाऱ्या दिल्या आणि आमच्या स्वयंसेवकांनी त्या व्यवस्थित पार पाडल्या. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला विलगिकरण करणे आणि रुग्णाला व्हेंटिलेटर, एचआरसिटी व रेमडीसीवीयर इंजेक्शन यांची गरजच लागणार नाही, अशी काळजी घेणे आवश्यक होते. त्यासाठी वेळेत कोरोनाची तपासणी आणि उपचार सुरू करण्याचे सूत्र अवलंबविले आणि ते यशस्वी झाले. याच पद्धतीने प्रत्येक गावात काम केल्यास गाव कोरोना मुक्त होईल, असा पवार यांनी व्यक्त केला.
गावात महिलांचे स्वयंसेवी नेटवर्क उभे राहावे
नोकर वर्गाचा तिरस्कार करू नका, या संकटात त्यांना गावच आधार आहे. त्यांचे योग्य पद्धतीने विलगिकरण करून गावात घ्या, आता गावात कोरोना सेंटर होतील तेथून कोरणाचा प्रसार होणार नाही याची काजी घ्या, विलगिकरण कक्षात जेवणाचे डबे घेऊन नातेवाईकांना पाठवू नका. आम्ही त्याची काळजी घेतली. आमचे स्वयंसेवक ते काम जबाबदारीने करतात. गावपातळीवर पुढाकार घेऊन काम करण्याची जबाबदारी सरपंच म्हणून आपली आहे. असेही ते म्हणाले.
सर्वांनी न चुकता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी
आपल्याला विमाकवच नाही. यासंदर्भात १५ व्या वित्तआयोगातून खर्च करण्यास ग्रामपंचायतींना परवानगी मिळावी यासाठी प्रधामंत्री, मुख्यमंत्री यांना आपण पत्र लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. गावात महिलांचे स्वयंसेवी नेटवर्क उभे राहावे अशी अपेक्षाही यावेळी पवार यांनी यावेळी व्यक्त केली. एकत्र कुटूंबपद्धती आहे म्हणून घाबरू नका. योग्य काळजी घ्या, ज्यांना कोरोना लस घेण्यासाठी वय मर्यादित आहे त्यांनी पहिली लस घ्या. गावात चांगले व्यवस्थापन केल्यास गाव कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. एचआरसिटीचा २२ स्कोर असलेली ६२ वर्षाची वृद्ध महिला, ८२ वर्षाचा वृद्ध असे लोक कोरोनावर मात करून हिरवेबाजारमध्ये बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाला हरवणे शक्य आहे, असा विश्वासही पोपटराव पवार यांनी यावेळी व्यक्त केला.