सिंधुदूर्ग - जिल्ह्याच्या राजकारणी चर्चा ही संपूर्ण राज्यात होत असते. इथलं राजकारण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भोवती फिरत असते. या विधानसभा निवडणूकीतही तीच स्थिती आहे. राणे नक्की कोणत्या पक्षाकडून लढणार हे निश्चित नाही. पण त्यांचे विरोधक त्यांच्या विरोधात एकवटले आहे. तसेच गृहराज्यमंत्री केसरकरांच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सिंधुदूर्गात एक वेगळीच चुरस पहायला मिळणार आहे.
कणकवली देवगड मतदारसंघ-
कणकवली - देवगड मतदार संघाचे सध्या नितेश राणे हे प्रतिनिधीत्व करतात. २०१४ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकाटवर निवडून आले होते. आता त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांना भाजप प्रवेशाची प्रतिक्षा आहे. मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांचा नितेश यांना विरोध आहे. याच मतदारसंघातून भाजपचेच स्थानिक नेते संदेश पारकर इच्छुक असून ते उमेदवारी अर्ज भरणार आहे. तर माजी आमदार प्रमोद जठार ही निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे राणे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जागा वाटपात हा मतदार संघ भाजपला सुटला आहे. जर राणे भाजपच्या तिकीटावर लढणार असतील तर त्यांना भाजपमधीलच आपल्या पारंपारीक विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. शिवाय मतदार संघातील शिवसैनिकांचाही राणे यांच्या उमेदवारीला विरोध आहे.
कुडाळ मालवण मतदारसंघ-
नारायण राणेंचा मतदारसंघ म्हणून या मतदार संघाची ओळख आहे. २०१४ च्या निवडणूकीत राणेंना धक्कादायक पराभव स्विकारावा लागला होता. राणे यांनी काँग्रेस सोडली आहे. त्यांचा स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही आहे. मात्र त्यांना भाजप प्रवेशाची अजूनही आस आहे. असे असले तरी ती शक्यता धुसर दिसत आहे. युती झाली आहे. जागा वाटपात हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. इथून विद्यमान आमदार वैभव नाईक शिवसेनेकडून पुन्हा एकदा मैदानात आहे. त्यामुळे राणेंना भाजपात जाऊनही सध्या तरी हाती काही लागणार नाही. त्यामुळे या मतदार संघातून राणेंना स्वाभिमान तर्फेच निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र राणे यांचे पुत्र निलेशही या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे. असे असले तरी कार्यकर्त्यांना नारायण राणेंनीच निवडणूक लढवावी असे वाटते. त्यामुळे या मतदार संघात सध्या तरी गोंधळाचे वातावरण आहे.
सावंतवाडी मतदार संघ-
सावंतवाडी विधानसभा मतदासंघ हा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा मतदार संघ आहे. मागिल निवडणूकीत ते राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यांना सरकारमध्ये गृहराज्यमंत्री पदही देण्यात आले होते. केसरकरांसाठी हा मतदार संघ तसा सुरक्षित समजला जातो. मात्र त्यांच्या विरोधात मित्रपक्ष असलेल्या भाजपचे नेते राजन तेली उभे रहाणार आहेत. शिवाय एकेकाळचे केसरकरांचे विश्वासू आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्याच बरोबर राष्ट्रवादीचे एम. के. गावडे हे ही उमेदवारी दाखल करणार आहे. हे सर्व जण केसरकरांचे पुर्वीचे सहकारी राहीले आहेत. राणे ही स्वाभिमाच्या माध्यमातून तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सावंतवाडीची लढतही रोमांचकारी होणार हे निश्चित.