सिंधुदुर्ग : कोरोनाबाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील कणकवली तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. यात नव्याने सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ते सर्वजण राजकीय संपर्कातील आहेत. यामध्ये शिवसेना नेते संदेश पारकर यांचा कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. यानंतर, तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३१ झाली आहे. शहर बाजारपेठेतील पारकर यांच्या निवासस्थानाचा ५० मीटर परिसर राजकीय गरमागरमी नंतर आज पुन्हा सील करण्यात आला.
शिवसेना नेते संदेश पारकर यांचा कोरोना अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शनिवारी त्यांच्या कुटुंबातील अन्य चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, आमदार वैभव नाईक यांच्या चुलत भावाच्या संपर्कातील वागदे येथील एकाचा आणि जानवली गावातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कणकवली शहरात २३ रोजी बाजारपेठ आणि सिद्धार्थनगरमधील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हे दोन्ही भाग पत्रे लावून सील केले होते. दरम्यान, बाजारपेठेतील भाग सील करताना वादंग झाले होते. त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी नेतेमंडळींशी चर्चा केली. त्यामुळे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास बाजारपेठेतील पत्रे काढून टाकण्यात आले. तर आज या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापल्याने बाजारपेठ आणि सिद्धार्थनगरमधील ५० मीटर परिसर पुन्हा पत्रे लावून सील करण्यात आला.
येथील नगरपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. नुकतेच त्या कर्मचाऱ्याच्या घराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले, तर त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्या नगरपंचायतमधील डेटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांना गृह विलगीकरण करण्याचे निर्देश नगरपंचायत प्रशासनाने दिले आहेत. कोरोना समूह संसर्ग रोखण्याचे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान आहे. शहरातील एक ज्येष्ठ व्यक्ती काही दिवसांपूर्वी घरपट्टी भरण्यासाठी नगरपंचायतमध्ये आली होती. ती व्यक्ती नंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाली. या व्यक्तीपासून नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
आमदार नाईक आणि शिवसेना नेते पारकर यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोना समूह संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. त्या अनुषंगाने नाईक, पारकर यांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाकडून घेतले जात आहेत.