सिंधुदुर्ग - कणकवली तालुक्यातील जाणवली येथे बंदुकीची गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. सखाराम महादेव मेस्त्री (वय ४५) असे मृताचे नाव आहे. रविकांत गणपत राणे उर्फ बाबू राणे याने डुकरांना हुसकवण्यासाठी गोळीबार केला असता हा प्रकार घडला आहे. दरम्यान, घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान जाणवली दळवीवाडी येथे बाबू राणे गणपती शाळेत गणपती साकारण्याचे काम करत होते. दरम्यान, शेतात डुक्कर शिरल्याची माहिती त्यांना काही लोकांनी दिली. त्यामुळे डुक्करांना हुसकावण्यासाठी त्यांनी लगबगीने आपल्याकडील शेती संरक्षणाची बंदूक घेऊन शेत गाठले. यानंतर डुक्करांना हुसकवण्यासाठी त्यांनी गोळीबार केला. मात्र, गोळी चुकून मेस्त्री यांना लागली.
घटनेनंतर आरोपी बाबू राणेने स्वतः पोलिसांपुढे हजर होत घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, सहायक पोलीस निरीक्षक बापू खरात, उपनिरीक्षक विनायक चव्हाण, राजेश उबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच प्राथमिक पाहणी केली. दरम्यान आरोपी रविकांत राणे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी करीत आहेत.