सिंधुदुर्ग - गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना जिल्हा बंदीचे सरकारने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. चाकरमान्यांना १४ दिवसांऐवजी ७ दिवसांचे क्वारंटाईन करण्याची खास परवानगी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार येईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. ते कुडाळ येथे बोलत होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात अधिकाऱ्यांनी काही सुचना केल्या होत्या. त्या इतीवृत्ताची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याची दखल घेत खासदार विनायक राऊत यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही. मात्र, चाकरमानी ज्या ठिकाणावरुन येणार त्याच ठिकाणी त्यांची कोविड चाचणी माफक दरात करण्याची मागणी शासनाकडे करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. तर जिल्हा प्रशासनाचे इतीवृत्त म्हणजे अंतिम निर्णय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.