सिंधुदुर्ग- उपअभियंता प्रकाश शेडेकर चिखलफेक व मारहाण प्रकरणी नितेश राणेंसह १९ आरोपींना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने हा आदेश दिला. २० हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तसेच तपासात पोलिसांना सहकार्य करणे आणि पुन्हा असा गुन्हा न करण्याची हमी देण्याच्या अटीवर न्यायालयाने सदर जामीन मंजूर केला आहे.
कणकवली दिवाणी न्यायालयाने मंगळवारी या सर्वांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपींतर्फे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्यानंतर नितेश राणेंसह १९ आरोपींना सशर्त जामीन मंजूर झाला आहे.
आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'च्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालून त्यांना गडनदी पुलाला बांधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांची चिखलातून धिंडही काढण्यात आली होती. या प्रकरणी शेडेकर यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून आ. नितेश राणे यांच्यासह कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण अशा १८ आरोपींना पोलिसांनी अटक केले होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची म्हणजेच ९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.