सिंधुदुर्ग - गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात काही कोरोनाग्रस्तांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठ्यातील हलगर्जीपणामुळे झाला. त्यामुळे गोवा फॉरवर्ड पक्षाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्य सचिव परिमल राय व ऑक्सिजन व्यवस्थापन व वितरणच्या प्रमुख स्वेतिका सचन या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हलगर्जीपणा, कटकारस्थान तसेच सदोष मनुष्यवध या आरोपाखाली आगशी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी कोरोना परिस्थती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याने न्यायालयाने सर्व कारभार आपल्या हातात घ्यावा, असे म्हटले आहे.
'मृत्यूला सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा जबाबदार'
बांबोळी येथील गोमेकॉ रूग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाला. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. या कोरोनाग्रस्त रुग्णांना सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा व सुविधा पुरवण्याची या तिघांची जबाबदारी होती. या रुग्णांना कमी दाबाने ऑक्सिजन पुरवठा झाल्याने अनेकांचा जीव गेला. मुख्यमंत्र्यांनी काल पीपीई किट घालून कोरोनाग्रस्त व्हेंटिलेटरवरील रुग्णांची पाहणी केली. ऑक्सिजन पुरवठा रुग्णांपर्यंत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे रुग्णांचा मृत्यू झाला असावा. रात्रीच्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा एकाएकी थांबल्याने अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच काहींचा मृत्यू झाला. साधन सुविधायुक्त असलेल्या राज्यातील गोमेकॉ रूग्णालयात २६ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्याला सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा जबाबदार आहे' असे तक्रारीत म्हटले आहे. तर '75 रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे', असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांसह तिघांविरोधात तक्रार
'ऑक्सिजन पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी तसेच त्रुटी उघडकीस येऊनही मुख्यमंत्र्यांसह इतर दोघा आयएएस अधिकाऱ्यांनी कोणतीच ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न केला नाही. ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही खंड पडू न देता रुग्णांचा जीव वाचविण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही. ते आपल्या कार्यात अपयशी ठरले. रूग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्याचे माहीत होते. तरीही या तिघांनी तो वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर दोघा आयएएस अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदारीत निष्काळजीपणा केला आहे. माहीती असूनही प्रयत्न न केल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांना जीव गमवावा लागला. हे तिघेही आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहेत. मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या तिघांनाही जबाबदार धरून गुन्हा नोंदवावा', अशी विनंती पक्षाचे संयोजक जॉन नाझारेथ यांनी तक्रारीत केली आहे.
'गोव्यातील शासन व्यवस्था मोडकळीस आलीय'
दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारवर आरोप केले आहेत. 'गोव्यातील शासन व्यवस्था मोडकळीस आली आहेर आणि सरकार फोटो काढण्यात व्यस्त आहे. अशावेळी न्यायालयाने कारभार हातात घेतला पाहिजे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर आणि सरकारचे दोष दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापलीकडे सरकार काही करत नाही. रात्रीच्या वेळी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रुग्ण मरत आहेत. सरकार ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करू शकत नाही', असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्ग व गोव्यात हायअलर्ट; किनारी भागात वाहू लागले जोरदार वारे