सिंधुदुर्ग - 'कोरोनामुळे जे बळी गेले, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे', असा आरोप भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. सर्वच रोगांच्याबाबतीत सरकार माकडचेष्टा करतंय, असे ते म्हणाले. तसेच महामारी हाताळण्याबाबत सरकार गंभीर नसून जनतेचं आरोग्य राखण्यासाठी देखील असमर्थ ठरल्याची टीका त्यांनी केली.
सध्या सिंधुदुर्गात माकडतापाचे संकट गडद होत आहे. अशा परिस्थितीत अद्याप शासनाकडून लस आलेली नाही. यावर बोलताना, सर्वच आजारांच्या बाबतीत सरकारने माकडचेष्टा चालवल्याचा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतःच कटिबद्ध व्हावं, असे ते म्हणाले.
नुकतेच राज्य सरकारने जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. त्यावर आक्षेप घेत, मेडिकल कॉलेजला परवानगी देण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या पालकमंत्र्यांसह सगळे लोकप्रतिनिधी थापाडे
शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री सगळे बोगस आहेत. थापा मारतात. लोकांची दिशाभूल करतात, असे म्हणत त्यांनी स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.