सिंधुदुर्ग - मुंबई गोवा महामार्गाच्या गोवा पेडणे येथील तेरेखोल नदी लगतची सुमारे शंभर फुटाची एक लेन वाहून गेली आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनी ही या महामार्गाचे काम करत असून, हे काम दर्जेदार नसल्यामुळे ही घटना घडली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुंबई गोवा महामार्गावर गोवा पेडणे येथे रेल्वे पुलाजवळ सुमारे एक किलोमीटरचा मार्ग हा तेरेखोल नदीकिनाऱ्याने जातो. याठिकाणी महामार्गाचा काही भाग हा नदीपात्राला लागून आहे. सध्या कोकणात जोरदार पाऊस पडत असून, या पावसामुळे महामार्गाला अनेकठिकाणी तडे गेलेले पाहायला मिळत आहे.
यातच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आज पेडणे येथील तेरेखोल नदी लगतचा भराव खचला आणि सुमारे शंभर फुटाची नदीलगतचे एक सिमेंट काँक्रीटची लेन वाहून गेली आहे. तसेच नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी महामार्ग वाहतुकीला धोकादायक बनला आहे. गोव्यातील या घटनेबरोबर आज कणकवलीतही महामार्गाच्या उड्डाण पुलाची भिंत कोसळली. यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीविरोधात येथील लोकांमध्ये संतापाची भावना आहे.