सिंधुदुर्ग - नितेश राणे यांनी कणकवलीत रस्त्याच्या प्रश्नावरुन राडा केला होता. त्या रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली आहे. कुठल्याही परिस्थितीत रस्ता दुरुस्त करुन घेणारच, असा इशारा राणे यांनी दिला होता. त्यामुळेच हा रस्ता दुरुस्त केला जात असल्याचे बोलले जात आहे.
राणे यांनी चिखलमय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राडा केला होता. त्यांनी महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. त्यानंतर राणेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक ही झाली. आता तोच रस्ता महामार्ग ठेकेदाराकडून दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. काही दिवस सुरू असलेल्या वादामुळे ठेकेदाराला जाग आली असावी, असे बोलले जात आहे.
राणे यांना बुधवारी न्यायालयाने जामीनही मंजूर केला. त्यामुळे रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली. कुठल्याही परिस्थितीत रस्ता दुरुस्त करुन घेणारच, असा इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता. राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर चिखलफेक केल्याने राज्यात या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. तर सत्ताधारी आपल्याच पाठपुराव्यामुळे रस्ते सुस्थितीत होत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कारण काहीही असो, कणकवलीकरांची चिखलमय रस्त्यापासून सुटका झाली आहे.