सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरील कामाचा वेग आणि दर्जाबाबत घेतल्या जाणाऱ्या संशयाला बळकटी देणारी घटना घडली आहे. या महामार्गावर कणकवली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाचा कणकवली पंचायत समिती जवळील काही भाग आज कोसळला. गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे निघाले असतानाच ही घटना घडल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी याच पुलाच्या जोडरस्त्याच्या भरावाची भिंत कोसळली होती.
सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे कणकवली शहरातून जाणाऱ्या भागात ४५ खांबी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. या पुलाला जोडणारा एक भाग मागच्याच महिन्यात कोसळला होता. त्यावरून बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू होत्या.हा वाद अजूनही सुरू असतानाच आज पुलाचा अर्धा भाग कोसळला. पाऊस नसताना ही घटना घडली. बांधकाम कंत्राटदारांकडून केली जाणारी फसवाफसवी व सरकारी यंत्रणांचे त्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मोदी सरकार सत्तेवर आले आणि नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळाली. पुढची १०० वर्षे टिकेल, असा काँक्रीटचा महामार्ग तयार करू, अशी घोषणा उद्घाटनाच्या वेळी गडकरी यांनी केली होती. त्यामुळे कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, महामार्गाच्या बांधकामात अनेक ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याचे आरोप होत आहेत. त्यातच अशा अपघातांच्या घटनांमुळे कोकणवासीयांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
उड्डाण पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर नागरिकांची कणकवली तहसीलदार कार्यालय येथे महामार्ग अधीक्षक अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी तहसीलदार आर.जे.पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, माजी आमदार परशुराम उपरकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, अशोक करबळेकर, राजन दाभोलकर, बाळू मेस्त्री, दया मेस्त्री, महामार्ग अभियंता आर.बी.पवार, संजय मालांडकर, संदीप मेस्त्री, संदेश पटेल, स्वप्नील चिंदरकर, ऍड. विरेश नाईक, संतोष सावंत, नगरसेवक बंडू हर्णे, मिलिंद मेस्त्री आदींसह कणकवली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कणकवलीकरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामाच्या दर्जाबाबत जाब विचारला.
यावेळी बोलताना महामार्ग अधीक्षक अभियंता सलीम शेख म्हणाले कि, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार कंटेनरने धडक दिल्यामुळे हा भाग कोसळला आहे. या कामाच्या दर्जाचे मुल्याकंन करणाऱ्या आरटी फॅक्ट कंपनीचा अहवाल आल्यानंतर आम्ही तो वरिष्ठांना पाठवू आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. असे अपघात पुन्हा घडू नयेत, कामाचा दर्जा राखला जावा, यासाठी कंपनीला समज दिली आहे. ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करा ही कणकवलीकर नागरिकांची मागणीही वरिष्ठांपर्यंत आपल्या अहवालामधून पोचवली जाईल, असेही शेख यावेळी म्हणाले. गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा येणार नाही अशाही सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या असल्याचेही ते म्हणाले.