सिंधुदुर्ग - मिठी नदी प्रकल्पग्रस्त म्हणून भलत्याच लोकांची शिफारस स्वतःच्या लेटरहेडवर करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती माजी खासदार तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. निलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
हेही वाचा - चिपी विमानतळ राज्याचा प्रकल्प, राणेंनी त्यात लुडबूड करू नये - उपरकर
मुंबईतील मिठी नदी प्रकल्पात खोटे प्रकल्पग्रस्त
डॉ. निलेश राणे यांनी याबाबतचे काही कागदपत्र पुराव्यासह प्रसिद्ध करताना, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मुंबईतील मिठी नदी प्रकल्पात खोटे प्रकल्पग्रस्त तयार करून त्यांना घर मिळावे म्हणून शिफारस केली. आधार कार्ड वेगळे आणि माणसे वेगळी, आमदारकी वापरून एजंटकडून पैसे कमवायचा हा धंदा. या विषयाच्या खोलपर्यंत जाऊन संबंधितांना शिक्षा होणार, याची मी खात्री देतो, असे एक ट्विट केले.
फक्त एकाला घर मिळाले आहे
मिठी नदी प्रकल्पग्रस्त म्हणून आमदार वैभव नाईक यांनी दहाजणांची शिफारस केली. त्यातील फक्त एकाला घर मिळाले आहे. उर्वरित ९ जण भलतेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आमदारकीचा गैरवापर आहे. त्यामुळेच, वैभव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असून निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार दाखल करणार असल्याचे निलेश राणे म्हणाले.
आमदारकीचा वापर बेकायदेशीर कामांसाठी
वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीचा वापर कुडाळ मालवणसाठी केला नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला संशय होता. ते आपल्या आमदारकीचा वापर बेकायदेशीर कामांसाठी करीत असून त्यांना आता सोडणार नसल्याचे निलेश राणे म्हणाले.
हेही वाचा - सिंधुदुर्गात गणेश चतुर्थीसाठी तीन लाख चाकरमानी दाखल