सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील साठ टक्के ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. असा दावा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. तर 2024 ला आमदार नितेश राणे यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे.
सेनेने राणेंना या पुर्वीच धक्का दिला आहे
कणकवलीत नितेश राणेंच्या मतदारसंघात तीन ग्रामपंचायती पैकी दोन ग्रामपंचायती सेनेने जिंकल्या. गेल्या दोन निवडणूकीत सातत्याने राणेंना धक्का दिला आहे. त्यामुळे राणेंचे अस्थित्व संपले आहे. भाजपला घेऊन राणे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सेनेने राणेंना या पुर्वीच धक्का दिला आहे. म्हणूनच ते भाजपमधे गेले. त्यामुळे हा खरा विजय महाविकास आघाडीचा असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.
2024 ला आमदार नितेश राणे यांना जागा दाखवून देऊ
जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत असताना 2024 च्या निवडणुकीत आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का मिळेल, असा दावा शिवसेना नेते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला. तोंडवली बावशी ग्रामपंचायतीची सत्ता ही शिवसेनेमधील अंतर्गत वादातून गेली आहे. तेथे भाजपची ताकद नाही असेही सावंत यांनी सांगितले. भिरवंडे येथे मूळ भाजप नव्हतीच. समर्थक भाजप तेथे उदयाला येत होती. ती शिवसैनिकांनी रोखली, असे देखील सतीश सावंत यांनी सांगितले.
नितेश राणे यांना ही धक्क्याची सुरुवात असल्याचा टोला सावंत यांनी लगावला. या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीचे 70 टक्के सरपंच विराजमान करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच निवडीवेळी धनशक्तीचा धोका आहे. मात्र त्यावेळी जी काळजी घ्यायला हवी ती आम्ही निश्चितपणे घेऊ, असे सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा - नारायण राणे मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते, विनायक राऊत यांचा गौप्यस्फोट
हेही वाचा - चिपी विमानतळाच्या शुभारंभाचा मुहूर्त टळला