सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही, बघून घेईन, अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत. मात्र, नारायण राणेंनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही, असे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - हत्येचा धक्कादायक उलगडा; दाराच्या फटीतून सबंध बघतो म्हणून केली रिक्षाचालकाची हत्या
एका पक्षातून गद्दारी करत राणेंचा दुसऱ्या पक्षात प्रवेश
नारायण राणेंनी सत्तेसाठी सुरुवातीला शिवसेनेबरोबर गद्दारी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्याला वर्ष होण्याअगोदर स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणे ईडीची कारवाई टाळण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झाले. या कालावधीत राणेंनी त्या त्या पक्षातील अनेकांशी गद्दारी करूनच पदे मिळविली. त्यामुळे, वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या राणेंनी गद्दारी या विषयावर बोलू नये, आणि कोणाला उपदेशही देऊ नये, असा टोला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik criticize Narayan Rane) यांनी लगावला.
कार्यकर्त्यांना धमकावून आपल्या दहशतीखाली ठेवण्याचा राणेंचा प्रयत्न
वैभव नाईक पुढे म्हणाले, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नारायण राणेंबरोबर नाहीत, हे हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राणेंच्या मुलांना स्वीकारत नाहीत, त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्यांना आपल्या दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न राणे करत आहेत. भाजपमध्ये दाखल झालेले राणे कुटुंबीय हे भाजपच्या भल्यासाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी दाखल झाले आहे. सत्ता असेल त्या पक्षात प्रवेश करून राणे स्वतः सत्तेचा उपभोग घेऊन आपल्या दोन्ही मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत, हे आता लपून राहिले नाही. राणेंची दहशत सिंधुदुर्गच्या जनतेने याआधीही मोडीत काढली आहे. आता भाजप कार्यकर्त्यांना धमकावून राणे पुन्हा जिल्ह्यात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत.
रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत राणेंचा सुपडा साफ
जिल्ह्यातील जनता राणेंची दहशत खपवून घेणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता व कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत, हे स्पष्ट होईल. रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत राणेंचा सुपडा साफ झाला, तेथील मतदारांनी राणेंना त्यांची जागा दाखवली आहे. सिंधुदुर्गमध्येही याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - कळणगुटचे आमदार मायकल लोबो यांची बंडखोरी