सिंधुदुर्ग - खासदार नारायण राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेचे खच्चीकरण होणार नाही. उलट दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले असून डब्ल्यू. एच. ओ. ने ही मुख्यमंत्री ठाकरेंच्या कोरोनाकाळातील कामाची स्तुती केली आहे. त्यामुळे राणेंना मंत्रिपद देऊन शिवसेनेचे खच्चीकरण होणार नाही. राणेंना मंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा, अशा शब्दांत सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत राणेंना मंत्रिपद मिळाल्याने होणाऱ्या शिवसेनेच्या खच्चीकरणाच्या चर्चेची खिल्ली उडवली.
कोणाला मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेचे खच्चीकरण होणार नाही -
सध्या खासदार नारायण राणेंना केंद्रात मंत्रपदाची लॉटरी लागणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. राणे हे शिवसेनेचे टोकाचे विरोधक आहेत. शिवसेना विरोधक म्हणून राणेंची ओळख आहे. त्यामुळे खासदार नारायण राणेंना होऊ घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची लॉटरी लागणार. मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंना केंद्रात मंत्रिपद देऊन शिवसेनेची गोची करण्यासाठी राणेंना राजकीय ताकद देणार अशी मोठी चर्चा सध्या राज्याच्या राजकीय पटलावर आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत याना विचारले असता कोणाला मंत्रिपद मिळाल्याने शिवसेनेचे खच्चीकरण होणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
जिल्ह्याचा कोरोना बाधित दर ७.४७ टक्के -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३०.६९, दुसऱ्या आठवड्यात २९.०९, तिसऱ्या आठवड्यात २२.९३ तर मे अखेर १९ टक्के जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट होता. सद्यस्थितीत जूनच्या पंधरवड्यामध्ये हा रेट ७.४७ टक्के एवढा खाली आला आहे. पुढील पंधरा दिवसात पॉझिव्हिटी रेट ३ पेक्षा कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी नव्याने जिल्ह्यात दाखल झालेले चार तज्ञ डॉक्टर काम करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे डॉक्टर येथील यंत्रणेशी चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मधून बाहेर पडेल, असा आशावाद पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४४ वर्षे वयोगट यावरील नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरु असून अद्यापही काही नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना लवकरात लवकर दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तर येत्या आठवड्याभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. आणखी काही ऑक्सिजन प्लांट उभारण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यात पुढील काळात कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असेही यावेळी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी? नारायण राणेंसह, अजून कोणाच्या नावाची चर्चा?