सिंधुदुर्ग - तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे आज संध्याकाळी गोव्यात आगमन झाले. यावेळी भाजपा कार्यकर्ते व हिंदू संघटनांनी त्याना काळे झेंडे दाखवत ममता बॅनर्जी परत जा चा नारा दिला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या राजकारणात नवख्या असणाऱ्या तृणमूल काँग्रेस च्या प्रवेशानंतर राज्यात राजकीय चिखलफेक वाढू लागली आहे. पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे गुरूवारी संध्याकाळी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यातील तृणमूलचे नेते लुझिनो फलेरो व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
हिंदू संघटनेचा जय श्रीरामचा नारा
पश्चिम बंगाल निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराचे परिणाम राज्यात दिसून आले. ममतांच्या आगमनानंतर त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून हिंदू संघटना व भाजपा कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी परत जा चा नारा देत त्यांच्या गोव्यातील दौऱ्याचा निषेध केला. तृणमूलच्या विचारानं आणि त्यांच्या कार्यपद्धतीला गोव्यात थारा दिला जाणार नसून त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवणार असा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे.
असा असणार ममतांचा गोवा दौरा
1) सकाळी 11 वाजता तृणमूल च्या नेत्यांसोबत बैठक
2) दुपारी 12 वाजता बेतीम येथे मच्छिमार संघटनांसोबत चर्चा
3) दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद
4) दुपारी 3.30 वाजता मंगेशी मंदिराला भेट देणार
5) संध्याकाळी 4 वाजता महालासा मंदिराला भेट देणार
6) 4.30 वाजता तपोभूमी कुंडई येथे भेट देणार
7) संध्याकाळी 6 वाजता गोव्यातील निवडक नागरिकांसोबत बैठक व त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा - Pegasus Snooping : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी करणार तज्ञ समिती; 8 आठवड्यात जमा करणार अहवाल