सिंधुदुर्ग - लॉकडाऊनमुळे आधीच स्थानिक बाजारपेठा बंद, त्यात गर्दी रोखण्यासाठी नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फटका कोकणातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा तयार माल पडून आहे.
जिल्ह्यातील कणकवलीच्या सावडाव येथील उत्तम वारंग यांनी आपल्या ३ एकर शेतात कारल्याची लागवड केली होती. त्यांनी आतापर्यंत १० ते १२ टन कारली वाशी मार्केटला पाठवली, मात्र अजून 40 टन कारली शेतात असल्याने त्याचे करायचे काय? असा प्रश्न वारंग यांना पडला आहे.
कणकवलीमधून कोल्हापूरजवळ असले तरी दर मिळत नसल्याने ते मुंबई, वाशी मार्केटला कारली पाठवतात. कोरोनामुळे बाजारपेठ बंद आहेत. रस्ते वाहतूक बंद आहे. त्यामुळे शेतातील कारली तशीच पडून खर्च वाढत असल्याने वारंग यांनी दीड एकरातील कारल्याच्या वेली कापून टाकल्या. वारंग यांना तीन एकर कारल्याची शेती करायला व इतर साहित्य घेण्यासाठी ८ लाख रुपये खर्च आला. मात्र, चांगले उत्पन्न मिळणार अशी अपेक्षा असताना कोरोनामुळे पदरी निराशा पडल्याची स्थिती आहे. कारल्याच्या शेतीतून ६० लाखांची अपेक्षा केली होती. मात्र, कोरोनामुळे कंबरडे मोडले असल्याची प्रतिक्रिया उत्तम वारंग यांनी दिली.