सिंधुदुर्ग - जिल्ह्यात भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याचा फोटोही मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्याच्या या मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी, गोवेरी परिसरात दोन लहान बछड्यांसह फिरणाऱ्या मादी बिबट्याने पिंगुळी येथील काही पाळीव जनावरांवर हल्ला करून ती फस्त केली होती. आता पुन्हा एकदा पिंगुळी गावातील मनुष्य वस्तीकडे बिबट्या दिसल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी दिली आहे.
पिंगुळी, गोवेरी तसेच जवळपासच्या परिसरातील मनुष्यवस्तीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मादी बिबट्या तसेच तिचे दोन बछडे भक्ष्याच्या शोधात फिरताना दिवसाढवळ्या स्थानिकांना दिसले होते. गोवेरी भगतवाडी येथील शेतकरी श्रीधर पालकर यांच्या शेळीवर हल्ला करत शेळी बिबट्याने फस्त केली होती. शेळीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.16 ऑक्टोबर) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पिंगुळी मुस्लिमवाडी येथील शाहीर खुल्ली यांच्या वासरावर हल्ला करून ती फस्त केली. त्यामुळे पाळीव जनावरांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. दरम्यान, आता पुन्हा पिंगुळी गावातील मनुष्यवस्तीकडे बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे. या बिबट्याचे मोबाईलवरही शूटींग करण्यात आले आहे. त्यामुळे या बिबट्यांबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मनुष्यवस्तीपर्यंत मादी बिबट्या येऊन पाळीव जनावरांवर हल्ले करू लागल्याने ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे धोक्याचे बनले आहे. या मादी बिबट्याचा व तिच्या बछड्यांचा वनखात्याने बंदोबस्त करून शेतकऱ्यांना भयमुक्त करण्याची मागणी होत होती. सर्व राजकीय पक्षांच्यावतीने उपवनसंरक्षक, सावंतवाडी यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन देऊन ही मागणी केली होती.
हेही वाचा - जिल्हा रुग्णालयात सुसज्ज 'आयसीयू' उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवा; पालकमंत्री उदय सामंत यांची सूचना