सिंधुदुर्ग - गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या कोकणातील गणेशचित्र शाळांमध्ये लगबग पहायला मिळत आहे. मूर्तीकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवत आहेत. नाजुक हातांनी गणरायाचे डोळे सजवणे, दागिने मढवणे, अशी कामे अहोरात्र सुरू आहेत.
कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि हा सण कोकणातील लहान मोठ्यांसाठी फार जिव्हाळ्याचा विषय असतो. येथील गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. गणेशोत्सवाचे वेध कोकणी माणसाला पावसाळ्याबरोबरच लागतात. आपल्या घरात यंदा येणारी गणेशमूर्ती कशी असावी यावर चर्चा होते. कॅलेंडरवरचे उत्तम चित्रे अगदी जपून ठेवलेली असतात. यावेळी गणपतीच्या शाळेत अशी हुबेहूब मूर्ती बनवायला सांगायची असा गुप्त बेत घरची वरिष्ठ मंडळी आखतात. या आराध्य दैवताचा कोकणातला रुबाबच काही वेगळा असतो.
गणपतीच्या शाळेत घराघरांतून नागपंचमीपर्यंत गणपतीची मूर्ती ठेवायचे पाट पोहोचलेले असतात आणि मग शाडूच्या मातीला आकार येऊ लागतो. कारागिराचे कसलेले हात लीलया फिरू लागतात आणि शाळेत एक एक मूर्ती अवतरायला लागते. शाडूचा मूर्तीवर शेड आणि मग होणारे रंगकाम एवढे सफाईदारपणे केले जाते की त्या मनोहारी मूर्तीसमोरून पायच निघत नाही. कोकणातल्या या गणपतीच्या शाळा ही खरी तर कलामंदिरे आहेत. कोकणात अजूनही पारंपरिक पद्धतीने गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात.