सिंधुदुर्ग- जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी नदी नाले कोरडे पडलेले पाहायला मिळत आहेत. कणकवली तालुक्यातील हरकुल खालची तेलीवाडी गावात विहिरींची पाणी पातळी खाली गेल्यामुळे येथील नळयोजना बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी येथील लोकांना विहिरीवर पायपीट करून पिण्याचे पाणी भरावे लागते, तर कपडे धुण्यासाठी 2 किलोमीटर अंतरावर नदीकाठी जावे लागते. या गावातील धरणाची पाणी पातळीही कमी झाली आहे.
गेल्या 10 वर्षात या गावात पाण्याचा दुष्काळ जाणवू लागला, अशी माहिती येथील गावकरी अनिल खानविलकर यांनी दिली. आम्ही रोज सकाळी महिला आणि पुरुष मिळून विहिरीवरून पाणी आणतो, असे ते सांगतात. सकाळी पाणी भरण्यासाठी रांग लावावी लागते. अनेकांना पायपीट करून पाणी भरावे लागते. या काळात आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पाहुणे मंडळींना जाणीवपूर्वक टाळतो. त्यांची पाण्यामुळे होणारी गैरसोय आम्हाला नको असते, असेही अनिल खानविलकर म्हणाले.
पुरेसे पाणी नसल्याने आम्हाला कपडे धुण्यासाठी 2 किलोमीटर चालत नदीकाठी जावे लागते. तिथेही साचून राहिलेले घाण पाणी आहे. परंतु काय करणार, आम्हाला त्यातच कपडे धुवावे लागतात, असे श्वेता खानविलकर म्हणाल्या. दूषित पाण्यात धुतलेले कपडे घातल्यावर अंगाला खाज येणे, अॅलर्जी होणे, असे प्रकार घडू लागले आहेत, श्वेता खानविलकर सांगत होत्या. मालवण तालुक्यातील मुणगे हे माहेर असून तिथे पाण्याची कमी नाही हे देखील त्यांनी सांगितले. मात्र या ठिकाणच्या अडचणींशी मी आता जुळवून घेत असल्याचे असेही त्यांनी सांगितले.
या गावात एक धरण असून त्याचीही पाणी पातळी खाली गेली आहे. दरम्यान, या गावासारखीच जिल्ह्यातील अन्य काही गावांची स्थिती आहे. यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे.