पणजी (गोवा) - सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्या तरुण तेजपाल यांच्या सुटकेला राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. 27 मे रोजी यावर सुनावणी होणार आहे, अशी माहिती राज्याचे ऍडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली आहे.
दरम्यान तेहलकाचे माजी संस्थापक-संपादक तरुण तेजपाल यांना म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले असले तरी, एका महिलेवर अन्याय झाला असल्याने निकालाच्या विरोधात आम्ही लवकरात-लवकर उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणात सर्व ठोस पुरावे उपलब्ध असताना एका महिलेवर झालेला अन्याय गोवा राज्यात सहन केला जाणार नाही. त्यामुळे, लवकरात-लवकर उच्च न्यायालयात याचिका सादर करण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. या प्रकरणी तेजपाल यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यानुसार आज उच्च न्यायालयात तेजपाल यांच्या सुटकेला गोवा सरकारकडून आव्हान देण्यात आले आहे. 27 मे रोजी यावर सुनावणी होणार आहे.
30 नोव्हेंबर 2013 रोजी तेजपाल यांना झाली होती अटक
बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तेजपाल यांना 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटक झाली होती, त्यांना सुमारे सहा महिने कोठडीत रहावे लागले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षातर्फे चार जणांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या. तसेच, अन्य किमान 80 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू असताना तेजपाल यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता. अखेरीस खटल्याची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेऊन, पूर्ण करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला.
प्रकरणाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा
या प्रकरणी तेजपाल यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 376 (बलात्कार) 341, 342, 354 अ व 354 ब या कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहकारी तरुणीचे लैगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सात वर्षांपूर्वी वर्ष 2013 मध्ये गोव्यात बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’च्या दरम्यान हे प्रकरण घडले होते. हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चांगलेच गाजले होते.
29 सप्टेंबर 2017 न्यायालयाने आरोपपत्र दाखल करून घेतले
तरुण तेजपाल यांनी एका सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर, प्रकरणातील गांभीर्य ओळखून हे प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आले होते. पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी या प्रकरणाचा तपास करून तेजपाल यांच्याविरोधात आरोपपत्र सादर केले होते. न्यायालयाने 29 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करून घेतले होते. या खटल्याची सुनावणी इन-कॅमेरा घेण्यात आली. खटल्यावरील सुनावणी लवकरात - लवकर पूर्ण करावेत असे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने दिले होते. या प्रकरणात त्यांची निर्दोष सुटका झाली आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन