सिंधुदुर्ग - आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेत. पुरोहित ऑनलाइन पूजा सांगत आहेत, हे चित्र यंदाच्या गणेशोत्सवात सर्रास दिसून येणार आहे. कोरोना महामारीमुळे बऱ्याच गोष्टींच्या व्याख्याच बदलल्या आहेत. तळकोकणात पुरोहीतांकरवी मंत्रोच्चारात गणपती पूजेची प्रथा आहे. मात्र यंदाच्या गणेशोत्सवामध्ये थेट संपर्क टाळण्यासाठी ऑनलाइन पुजेचा मार्ग शोधण्यात आला आहे.
दुर्गम भागात नेटवर्क प्रॉब्लमवर पर्याय म्हणून त्या त्या भागातील पुरोहितानी थेट पूजा कशी करावी याचा व्हिडीओ बनवून पर्याय शोधला आहे. जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव अजिबात नाही अशा ठिकाणी शासन नियमांचे पालन करत पुरोहीत पौरोहित्य करू शकतात असा निर्णय महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ, सिंधुदूर्गने सर्वानुमते घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळूणकर यांंनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४८४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७९ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. या पार्श्वभूमीवर विराजमान होणाऱ्या बापांची पूजा करायला ब्राम्हण आता आपल्या घरी येणार नसून जिल्ह्यात प्रथमच ऑनलाईन पूजा सांगितली जाणार आहे.