सिंधुदुर्ग - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा फटका कोकणातील आंबा काजू पिकाला बसत आहे. गेल्या आठवड्यात तळकोकणातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. वाढलेला उष्मा, वादळी वारे, पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
सिंधुदुर्गात गेल्या आठवडाभर हवामानात बदल जाणवत आहे. अधूनमधून झालेली पावसाची रिपरिप, ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि आता उष्णतेची लाट यांमुळे आंबा काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेशमार्गे कोकणामध्ये हे वारे वाहत आहेत.
या वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम येथील आंबा आणि काजू पिकावर होत आहे. कोकणातील आंब्याचे पीक सध्या तयार झाले असून तोडीला आलेले आहेत. वाऱ्यांमुळे आंब्याच्या झाडावर असलेल्या तोडणी योग्य फळांची मोठ्या प्रमाणात फळ गळ झाली आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे ऐन हंगामात होतातोंडाशी असलेल्या आंबा, काजू, कोकम पिकांसह करवंद, जाभूळ आदी रानमेव्यावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत आहे. दरम्यान आंबा काजू पिकांच्या नुकसानीची दखल घेऊन प्रशासनाने वेळीच पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.