सिंधुदुर्ग - तब्बल पंधरा दिवसानंतर आमदार नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर आले आहेत. आज (गुरुवारी) त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भेट देत नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. कणकवलीत झालेल्या शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे हे सह आरोपी असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
- नवनिर्वाचित अध्यक्ष हे नितेश राणे यांचे निकटवर्तीय
जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड गुरुवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्ष म्हणून मनीष दळवी आणि उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष असलेले मनीष दळवी हे नितेश राणे यांचे निकटवर्तीय आहेत. नितेश राणे समर्थक म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. उपाध्यक्ष असलेले अतुल काळसेकर हे मूळ भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. या दोघांची जिल्हा बँकेत भेट घेत आमदार नितेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- जामीन अर्जावर उच्च न्यायालयात 17 जानेवारीला होणार सुनावणी
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुनी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सचिन सातपुते या आरोपीचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत फोनवरून कॉन्टॅक्ट होता. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणे यांना सह आरोपी करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाकडे सरकारी वकिलांनी केली होती. तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारीत आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची नावे दिली होती. याप्रकरणी नवनिर्वाचित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि आमदार नितेश राणे यांचे सचिव राकेश परब यांचे देखील नाव समोर आले होते. या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 17 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
हेही वाचा - Santosh Parab Attack Case : नितेश राणे यांच्या जामिनावर 17 जानेवारी मुंबई उच्च न्यायालय देणार निकाल