सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील कुडाळ निवजे येथील ८० वर्षीय आजी लक्ष्मी पालव यांनी आपल्या कुटूंबासह रांगणागड पायी चालत अवघ्या सव्वादोन तासात सर केला आहे. समुद्र सपाटीपासून या गडाची २२२७ फूट उंची आहे. खडकाळ आणि जंगलातील पायवाट असल्याने हा गड सामान्य माणसाला चढून जाणे अत्यंत कठीण समजला जातो.

कुटुंबीयांसोबत गाठला रांगणागड
सिंधुदुर्गातील कुडाळ निवजे येथील ८० वर्षीय आजी लक्ष्मी पालव यांनी आपल्या कुटुंबासह रांगणागड पायी चालत अवघ्या सव्वादोन तासात सर केला. सायंकाळी आजीबाई त्याच जोमाने गडावरून पुन्हा खाली उतरल्या. या वयातील मोठ्या जिद्दीने त्यांनी केलेला हा प्रवास थक्क करणारा आहे. लक्ष्मी पालव यांच्या वारंग आणि पालव या दोन्ही कुटुंबातील नातवंडानी रांगणागडावर जायचा बेत आखला. त्यांच्या नियोजनात कुटुंबातील सर्वांनी मिळून गडावर एक दिवसाची सहल काढण्याचे निश्चित केले. नातवंड आणि पतवंडानी आपल्या आजीला सोबत गडावर येण्याचा आग्रह धरला. आजीनेही मोठ्या उत्साहाने होकार दिला.

तीन पिढ्यांच्या कुटुंबीयांसोबत घेतला ट्रेकचा आनंद
आजी आपल्या सोबत येणार म्हणून नातवंडे, पतवंडे यांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. ठरलेल्या तारखेनुसार सकाळी आठ वाजता आपल्या तीन पिढ्यांच्या कुटुंबासमवेत शिवाजी महाराजांच्या जयघोषात लक्ष्मी आजींनी गडावर चढायला सुरुवात केली. त्यांचे एक एक पाऊल गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत होते. नातवंडे, पतवंडा सोबत वाटेतील एक वेगळा आनंद घेत लक्ष्मी आजींनी थकवा जाणवू न देता सव्वादोन तासात गड सर केला. कुटुंबासोबत गडावर मौजमजा करीत त्या सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाल्या. दोन सव्वा दोन तासात त्यांनी पुन्हा गड उतरून या वयातही यशस्वी केलेली रांगणागडाची सफर सर्वानाच अचंबित करणारी आहे.
आजींनी सांगितले तंदुरुस्तीचे गमक
घावनळे गावचे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या लक्ष्मी पालव या आजी आहेत. पालव आजी यांची घरची शेती असून अजूनही त्या शेतात काम करायला जातात. या वयातही त्या निरोगी आहेत. त्यांचा हा प्रवास तरुणाईला लाजविणारा असाच आहे. आपण एक दोन वेळच बसलो मात्र बाकी लोक ठिकठिकाणी बसत, आराम करत चालत होते असे यावेळी या आजीनी बोलताना सांगितले. सकाळी वेळेत उठणे, शेतात काम करणे आणि चांगला आहार घेणे हेच आपल्या तंदुरुस्तीचे गमक असल्याचे आजींनी सांगितले.
शाहू-ताराबाई संघर्षात पन्हाळ्यावरून निघून ताराबाई या गडावर होत्या वास्तव्यास
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेवर रांगणा हा अत्यंत दुर्गम असा गड आहे. घनघोर जंगलातून या गडावर जावे लागते. अत्यंत खडकाळ पायवाट आणि तोल गेला तर दरीत कोसळण्याची भीती असल्याने या गडाचा ट्रेक अत्यंत धोकादायक मानला जातो. समुद्र सपाटीपासून या गडाची उंची २२२७ फूट आहे. औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू-ताराबाई संघर्षात पन्हाळ्यावरून निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यांनी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला.
करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा होतो उल्लेख
सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्त्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधड्या छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येईपर्यंत करवीरकरांकडे राहिला.
हेही वाचा - केंद्रीय पथकाला जाब विचारण्यासाठी जाणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात