सिंधुदुर्ग - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १ जूनपासून आतापर्यंत १५२ घरांचे, २३ गोठ्यांचे व इतर मालमत्तेचे मिळून ४९ लाख ६२ हजार ८६० रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला. मात्र मुसळधार पावसामुळे ( Heavy rain Sindhudurg ) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले. मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे १५२ घरांचे व २३ गोठ्यांचे नुकसान झाले. तर इतर १३ मालमत्तांचे नुकसान झाले. पडझड झालेल्या घरांमध्ये ६ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार ८६० रुपये एवढे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.
'या' तालुक्यांना फटका : नुकसानीमध्ये वेंगुर्ले तालुक्यातील २, कुडाळ तालुक्यातील १ आणि देवगड तालुक्यातील ३ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतली असली, तरी त्यापूर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांची व गोठ्यांची तसेच सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली आहे. जिल्ह्यातील १२७ पक्क्या घरांची, तर २५ कच्च्या घरांची अशाप्रकारे १५२ घरांची पडझड झाली आहे. २३ गोठे आणि १३ इतर मालमत्तांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले, कुडाळ आणि देवगड या तीन तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घरांचे मोठे नुकसान : आतापर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे १२७ पक्क्या घरांचे ३३ लाख ८० हजार ११० रुपये नुकसान झाले. २५ कच्च्या घरांचे ४ लाख ९० हजार एवढे नुकसान झाले, तर २३ गोठ्यांचे ५ लाख ६९ हजार ६५० रुपये नुकसान झाले. दुकाने, स्टॉल अशा इतर १३ मालमत्तांचे ५ लाख २३ हजार १०० रुपये, असे मिळून आतापर्यंत एकूण ४९ लाख ६२ हजार ८६० रुपये नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.
हेही वाचा - Human Flying Drone : माणसाला घेऊन उडणारा 'ड्रोन' विकसित; चाकण परिसरात झाली यशस्वी चाचणी