सिंधुदुर्ग - जिल्हा रुग्णालयातील परिचारीकांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत एकच खळबळ मांजली. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गावकर यांच्याकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत या परिचारीकांनी सायंकाळी उशिरापर्यंत काम बंद ठेवल्याने कोविडचे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल झाले.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांविरोधात परिचारीकांचा एल्गार
कोरोना साथीत पडलेला अतिरिक्त ताण आणि मिळणाऱ्या असुविधा व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गावकर यांच्याकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक यामुळे जिल्हा रुग्णालयातील महिला परिचारीकांचा संयम सुटला आणि प्रमुख नर्सेसनी जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन छेडले. जिल्हा शल्यचिकित्सकांची केबिन गाठत जाब विचारले. ही घटना समजताच आमदार नितेश राणे आणि आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत परिचारीकांचा शांत केले. २ जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची विनंती करत यशस्वी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील रुग्णसेवा पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला.
जिल्हा रुग्णालयात वाढविण्यात आला पोलीस बंदोबस्त
यावेळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. परिचारीकांनी काम बंद केल्यामुळे कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे रुग्ण सेवा ठप्प होईल, या भितीने चिंताग्रस्त बनले होते. आमदार नितेश राणे यांनी यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना जाब विचारले.