सिंधुदुर्ग - सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत माईन येथील एका व्यक्तीकडून बंदुकीचे छेरे मिळून आले आहेत. संबधित व्यक्तीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेला खवले मांजर असल्याची खबर मिळाली असल्याने ही धाड टाकण्यात आली होती. मात्र कोणतीही संशयास्पद गोष्ट या व्यक्तीकडे आढळून आली नसल्याचे संबधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेला वन्यजीव सिंधुदुर्ग तालुक्यातील माईन गावातील एका संशयित व्यक्तीकडे असल्याची माहिती उत्पादन विभागाला मिळाली होती. या माहितीवरून सीमा शुल्क अधीक्षक अभिजित भिसे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक राजेश लाडे, अमोल चित्रांश, दिनेश नीना व श्रवण मेघावाल यांच्या पथकाने सर्च वारन्ट घेऊन संशयिताच्या घरी छापा टाकला.
संपूर्ण घराची सीमा शुल्क विभागाकडून झडती-
संशयितांच्या संपूर्ण घराची सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून झडती घेण्यात आली. तर घराशेजारील बायोगॅसही तपासण्यात आला. घराच्या लगत असलेल्या गोठ्याचीही झडती घेण्यात आली. मात्र बंदुकीच्या छऱ्या पलीकडे घरात काही आढळून आले नाही. याबाबत कणकवली सीमाशुल्क कार्यालयात संबधित संशयितांची कसून तपासणीही करण्यात आली आहे.