सिंधुदुर्ग - नरडवे महंमदवाडी धरणाचे रनिंग बिल ६२, या एकाच बिलापोटी एकाच वेळी ६७ कोटी रुपये २३ मार्चला काढण्यात आले. कोविड असल्याने राज्य सरकारने शिल्लक निधीची परत मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी हा निधी एकाच दिवशी अदा करून ४० कोटींचा भ्रष्टाचार धरण ठेकेदार आणि पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांनी संगनमताने केला असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. हे काम निकृष्ट झाल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. याबाबत त्यांनी सीबीआय, तसेच ईडीकडेही धाव घेतली आहे.
हेही वाचा - खासदार विनायक राऊतांना धमकी देणाऱ्या निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा; शिवसैनिकांची मागणी
केवळ ३१ दिवस काम करून तब्बल ६७ कोटींचे पेमेंट
चक्रधर कंस्ट्रक्शन जळगाव, ही कंपनी २०१९ पासून धरणाचे काम करत आहे. मार्च २०२० पर्यंत केवळ ३१ दिवस काम करून तब्बल ६७ कोटींचे पेमेंट ठेकेदार चक्रधर कंस्ट्रक्शनला पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. कोविड काळात निधी आरोग्य विभागाकडे वळवला असतानाही पाटबंधारेच्या अभियंत्यांनी २३ मार्च रोजी ६७ कोटींचे पेमेंट एकाच दिवशी दिले. त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपरकर यांनी केला.
एमबी रेकॉर्ड मधील पेज नंबर आणि चॅनेज नंबर मध्ये तफावत
सुरुवातीचे टेंडर सी १ दर्जाचे होते. २००५ साली ६.६ मीटर उंची वाढवल्याने बी १ सूची दराने टेंडर निघाले. त्यामुळे, रनिंग बिल ६२ मध्ये रेकॉर्डिंग करताना सी १ पद्धतीने बिल केले. मात्र, पेमेंट बी १ पद्धतीने केले. गौण खनिज वसुली करताना सी १ पद्धतीने बिल रेकॉर्ड केले, मात्र बिल अदा करताना बी १ पद्धतीने केले. एमबी रेकॉर्ड मधील पेज नंबर आणि चॅनेज नंबरमध्ये तफावत आहे. प्रत्यक्ष हारटिंग आणि केंसिंगचे ३ लाख ४२ हजार ८०० क्युबिक मीटरचे काम झाल्याचे दिसत आहे. मात्र, बिलात रेकॉर्ड करताना १३ लाख ९२ हजार ९१६ चे हारटिंग आणि केंसिंगचे बिल बी १ पद्धतीने केले आहे. एकूण १० लाख ५ हजार ११६ क्युबिक मीटरची लांबी जास्त दाखवली गेली आहे. काही ठिकानी पिचिंग वर्क केले नाही, असा आरोप उपरकर यांनी केला.
पिचिंग केल्या ठिकानी ४ इंच वाळू कोरस फिल्टर ८ इंच दगड आणि पिचिंग स्टोन १ फूट ६ इंच हा डाऊन स्टीम बाजूने आणि अपस्टीमला ३० एमएमचा दगड असणे आवश्यक आहे.
ठेकेदाराकडून २० कोटींच्या रॉयल्टी ऐवजी भरून घेतले ४ कोटी
२० कोटी ३२ लाख २६ हजार ६६६ रुपयांची रॉयल्टी प्रत्यक्ष भरणे आवश्यक असताना ४ कोटी ९६ लाख ६३ हजार ६९ रुपये रॉयल्टीपोटी ठेकेदाराकडून भरून घेतले. ठेकेदाराच्या घशात १५ कोटी ३५ लाख ६३ हजार ५९७ रुपये पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने घातल्याचा आरोप उपरकर यांनी केला. रनिंग बिल ६२ मध्ये ४० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही उपरकर यांनी केला. याबाबत प्रधान सचिव जलसंपदा, प्रधान सचिव पाटबंधारे, प्रधान सचिव वित्त, मुख्य अभियंता, तसेच केंद्र सरकारच्या संबंधित योजनेच्या चीफ एक्झिक्युटिव्ह, तसेच पीएमओ ऑफिसला तक्रार केली असून, सीबीआय तसेच ईडीला भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तक्रार अर्ज दिल्याची माहिती उपरकर यांनी दिली.
हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत भाजपा नगरसेवक शिवसेनेत गेल्याने भाजपचाच जल्लोष