सिंधुदुर्ग - मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण पुलावरून मुंबईच्या दिशेने जाणारा महेश ट्रान्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा भारत बेंझ कंपनीचा कंटेनर ( एम. एच. ४७ ए. एस. २२६०) भरधाव वेगाने जात असताना खारेपाटण ब्रिजवरून थेट नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये वाहन चालक व क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात किशन सुभाष – वाहन चालक (वय ३३, रा. उत्तरप्रदेश) व सोबत क्लीनर (ओळख पटली नाही) अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदर कंटेनर सीपला कंपनीचे मेडिसिन घेऊन मुंबईच्या दिशेने चालला होता. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर खारेपाटण ब्रिजवरून सुमारे ८० फूट खोल नदीत कोसळला. परंतु नदीत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता. गावकऱ्यांच्या मदतीने खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी पोलीस नाईक उद्धव साबळे, होमगार्ड अमोल परब, भालचंद्र तिवरेकर, वन विभागाचे विश्वनाथ माळी, खारेपाटण ग्रामस्थ नितीन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, संदेश धुमाळे आदींनी तातडीने सहकार्य केले. नदीत पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने मदत करताना अडचण येत होती. मृतदेह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुढील तपासासाठी नेण्यात आले. या अपघाताचा अधिक तपास खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी करत आहेत.
हेही वाचा - Heart Wrenching Event: आईने दोन वर्षांच्या मुलीला मारुन ओव्हनमध्ये लपवले