सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील काँग्रेसला धक्का बसला असून आज माजी जि.प अध्यक्ष आणि विद्यमान काँग्रसे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघात काँग्रेसकडून काका कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे पक्षावर नामुष्कीची वेळ आली होती. तेव्हापासून पक्षात ते वर्षभर अडगळीत होते. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. कुडाळ येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, माजी मंत्री प्रवीण भोसले, राज राजपूरकर आदी उपस्थित होते.
सध्या राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रानंतर कोकणात पक्षवाढीकडे पक्षाने लक्ष दिले आहे. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर हे नारायण राणे यांचे प्रबळ राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रवेशानंतर आज काका कुडाळकर यांचा राष्ट्रवादी पक्षात जिल्ह्यातील दुसरा मोठा प्रवेश झाला आहे. कुडाळकर हे नारायण राणे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. राणे यांनी काँग्रेस सोडली आणि कुडाळकर यांनी राणेंना सोडले. आज अखेर ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.