सिंधुदुर्ग - क्वारंटाईनमधील 14 दिवसांचा काळ सध्या सर्वच चाकरमान्यांना मोठा त्रासदायक ठरत आहे. मात्र काहींनी यातही विरंगुळा शोधला असून ते स्वतः सोबत इतरांचेही मनोरंजन करत आहेत. मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील हे दोघे चुलत बंधू आहेत.
या दोघांनी सोशल माध्यमातून बनवलेले व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले असून दशावताराच्या माध्यमातून कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणात या दोघांनी दाखविलेली सकारात्मकता शाळेत कसे राहणार? असा प्रश्न पडलेल्या अनेक चाकरमान्यांसाठी प्रेरणादायी बनली आहे.
वडाळा व कल्याण येथे अडकून पडलेले हे भाऊ दुचाकीने गावी कांदळगाव येथे आले. तेथे ते 14 दिवसासाठी संस्थात्मक विलगीकरणात असल्याने ओझर विद्यामंदिर येथे मुक्कामाला आहेत. यातील एक भाऊ हा ‘गेले भजनाक पोचले लग्नाक’ या मालवणी नाटकात भूमिका करतो. ओझर विद्यामंदिर येथे शिक्षण घेतल्याने शाळे प्रती सामाजिक भावनेतून प्रथम सर्व परिसर तेथील सर्वांनी साफ केला. क्वारंटाईन ही कोणती शिक्षा नसून विद्यामंदिरांची सेवा करण्याची संधी असल्याचे तो म्हणाला.
क्वारंटाईनमध्ये करमणुकीचे साधन म्हणून फक्त मोबाईलच आहे. याच मोबाईलचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग पाळून शॉर्ट व्हिडिओ बनवून मनोरंजन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या 14 दिवसात आमचे एक कुटुंब तयार झाले आहे. ग्रामपंचायत आणि गावातील काही ग्रामस्थांनी खूप मदत केल्याचे दुसरा म्हणाला. क्वारंटाईन कालावधीत ओझर विद्यामंदिर येथे वास्तव्यास असलेल्या या बंधूंनी विविध नृत्य प्रकारचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर बनवले आहेत. त्यांचे हे व्हिडिओ समाज माध्यमातून चांगल्या प्रतिक्रिया मिळवत असल्याचे दिसत आहे.