सिंधुदुर्ग - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या रद्द करून जनतेला वेठीस धरू नका. कणकवलीतून ८० कर्मचारी मुंबईतील बीएसटी सेवेसाठी जात आहेत. या चालक-वाहकांना जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत भाजप कार्यकर्त्यांनी कणकवली येथील बस स्थानकात बस रोखल्या. तसेच, एसटीचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्यासह अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
हेही वाचा - 'ड्रेस कोडने अधिकाऱ्यांचा उर्मटपणा कमी होईल का? कामाचा वेग वाढवण्यासाठी लक्ष द्यावे'
कणकवली येथील एसटी बस स्थानकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, उपाध्यक्ष सोनू सावंत, सरचिटणीस महेश गुरव, संदीप मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, सचिन परधिये, संदीप सावंत, विजय कदम, अनिल घाडीगावकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. चालक-वाहक यांना घेऊन जाणाऱ्या बस स्थानकातच उभ्या असताना रोखण्यात आल्या. मुंबईत जाण्यासाठी ८० चालक-वाहक गोळा झाले होते. शनिवारी रात्री ७.३० वाजता अचानक झालेल्या आंदोलनामुळे वातावरण तंग झाले होते. घटनास्थळी कणकवली पोलिसांनी तत्काळ पोलीस बंदोबस्त वाढवला होता.
अचानक आंदोलनाने वातावरण तापले
कणकवलीत भाजपने अचानक आंदोलन केल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी बोलताना भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे म्हणाले की, येथील ग्रामीण भागातल्या लोकांची गैरसोय करून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना मुंबई येथे पाठवत आहे. या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने पाठवले जात. त्यांची त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था केली जात नाही. यापुढे वयस्कर कर्मचाऱ्यांना पाठवले जाणार नसल्याचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी आपल्याला सांगितले असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - अनैतिक संबंधातून तृतीयपंथीयाचा खून; चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल