सिंधुदुर्ग - राज्यातील कुठलाही सरपंच हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे, अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसले आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? असा टोलाही त्यांनी लगावला. राणे सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडीचे सरकार पवारांच्या कृपेमुळे -
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शरद पवारांच्या कृपेमुळे बसले आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे, असे नारायण राणे यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंचे कोणीही ऐकत नाही. कारवाई केली तर हातात आहेत तीही लोक पळतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्रालयात ते येत नाहीत -
मुख्यमंत्री घरातून बोलतात. लोकांसमोर येऊन बोलत नाही. मंत्रालयात ते येत नाहीत. इतरांना ५० माणसे जमवू द्यायची नाही आणि मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथी गर्दी जमवल्याप्रकरणी काही कारवाई केली नाही, अशी टीकाही राणेंनी केली. तसेच टीव्हीवरुन बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात. मात्र, ते काही उत्तर देत नाही. त्यांचे कोणीही ऐकत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे, असा टोलाही ही नारायण राणे म्हणाले.
हेही वाचा - राज्याच्या विजमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत आर्थिक गैरव्यवहार केला - भाजप प्रवक्ते विश्वास पाठक
त्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज कोणाचा?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या अनेक क्लिप बाहेर आल्या आहेत. इतके असताना चौकशी होत नाही. त्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज कोणाचा आहे? संभाषण कोणाचे आहे? तिला डॉक्टरकडे ने, हे कर ते कर, हा आवाज कोणाचा आहे? तर संजय राठोड १५ दिवसांनी सांगतात की भाजप त्यांचे कुटुंब उद्धवस्त करायला निघाले, भाजपला काही कामधंदे नाहीत का? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.
सरकारला अधिवेशन गुंडाळायचं -
अर्थसंकल्पीय अधिवेशन सरकारला गुंडाळायचे आहे. म्हणूनच राज्यात सरकारकडून कोरोनाचा बाऊ केला जात आहे. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला या सरकारकडे काही नाही म्हणून कोरोनाचा आधार घेतला जात आहे. सरकारमधील मंत्र्यांनाही अचानक कोरोनाची लागण होऊ लागली आहे, तेव्हा अधिवेशन गुंडाळण्यासाठी हा राजकीय कोरोना असल्याचे ते म्हणाले.